शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भ्रष्टाचारविरोधी मुद्द्यांवरून वातावरण तापताना दिसत आहे.यामध्ये ‘यादव पॅनेल’ने तरुणांना सोबत घेत “परिवर्तन” हा प्रमुख नारा देत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.“युवा लढणार आणि परिवर्तन घडणार” या घोषवाक्यासह पॅनेलने निवडणुकीसाठी प्रचार गतीमान केला आहे.दरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षणच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणे आणि स्थानिक विकासातील भ्रष्टाचाराचा “पॅटर्न” मोडून काढणे हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य विषय आहेत.शेतकऱ्यांच्या हितासाठी भुमिपुत्रांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे,असे मत पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्या नेतृत्वात या पॅनेलने शिरोळमध्ये “सर्वांगीण विकास” हा संकल्प ठेवून जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात मतदानदारांशी संवाद साधत स्थानिक समस्यांची माहिती घेतली जात आहे.विकासकामांमध्ये पारदर्शकता,तरुणांसाठी रोजगारनिर्मिती,मूलभूत सुविधा,रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मुद्द्यांवर खास लक्ष देण्याचा त्यांचा दावा आहे.शिरोळ शहरात अनेक वर्षांपासून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.नागरिकांच्या दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष झाले असून आता नवे नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांचे मत व्यक्त केले जात आहे.“न्यायासाठी तुमचे एक मत निर्णायक ठरेल,”असा संदेश देत ते मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीसाठी इतर पॅनेल आणि पक्षांनीही तयारी सुरू केली असून लवकरच प्रचाराला अधिक वेग येणार आहे.शिरोळच्या मतदारांकडून कोणत्या पॅनेलला कौल मिळतो,हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.मात्र,यादव पॅनेलने केलेल्या परिवर्तनाच्या दाव्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच रंगत आली आहे.