शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या प्रतिष्ठेच्या प्रभाग ९ मध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून या प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे.शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि विरोधी आघाडीतून पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे पुतणे पद्मसिंह पाटील यांच्यात थेट लढत होत आहे.एकेकाळी एकत्र काम करणारे हे दोन्ही गट आज समोरासमोर विरोधात उभे ठाकले असून यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.प्रभाग ९ मध्ये यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार बनण्यामागे बाबा पाटील यांची आखलेली रणनिती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.राजकारणातील मुरब्बी म्हणून ओळख असलेल्या बाबांनी या मतदारसंघात प्रत्यक्ष गाठीभेटींचा धडाका लावला आहे.घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला आहे.विविध प्रश्नांवर चर्चा करत आपल्या योजनांची माहिती देत त्यांनी मतदारांशी बांधिलकीचे नवे धागे विणले आहेत.त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, प्रभागातील रोजचे बदलते राजकीय समीकरण आणि मतदारांचा ओढा पाहता या प्रभागात अनिश्चिततेचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.पद्मसिंह पाटील यांच्याकडेही स्थानिक कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा असून त्यांनीही प्रचाराचीही गती वाढवली आहे.मात्र,बाबांच्या प्रत्यक्ष संपर्क मोहिमेमुळे मतदारांमध्ये “बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत,काळजी करू नका”असा सूर ऐकू येत आहे.या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या या निवडणुकीची सरशी कोण करणार,याबद्दल उत्सुकता वाढली आहे.शिरोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या महत्वाच्या प्रभागाकडे लागले असून येणारा निकाल आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल,यात शंका नाही.