तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट; स्वाभिमानी युवा आघाडीची कारवाईची मागणी

Spread the love

तेरवाड / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी शासनाकडून सुमारे ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.संबंधित काम पूर्णही झाल्याचे दाखविण्यात आले.मात्र प्रत्यक्षात बंधाऱ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक असून दुरुस्ती काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिक स्तरावरून होत आहे.दुरुस्तीच्या दरम्यान बंधाऱ्याला नवीन बर्गे बसविण्यात आल्याची माहिती मिळते.परंतु यापैकी १७ ते ३५ क्रमांकाच्या गाळ्यांमधून मोठ्या प्रमाणात लिकेज राहिल्याने बंधाऱ्यात साठविण्यात येणारे पाणी अडवलेच जात नाही. त्यामुळे संपूर्ण पाणी खाली वाहून जात असून स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या बंधाऱ्याची दुरुस्ती अपेक्षित दर्जाची न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही सांगितले जात आहे.या सर्व बाबींवर स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी संबंधित विभागावर तीव्र आरोप केले आहेत. शासनाकडून एवढा मोठा निधी मंजूर होऊनही कामात झालेले दोष हे गंभीर आहेत.संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी,जर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही,तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही धरणाच्या पाण्यात उतरून पाटबंधारे विभागासह शासनाचा निषेध नोंदवू असा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेवरही दबाव वाढला आहे. स्थानिक शेतकरी संघटनांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर दोषींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.तेरवाड बंधाऱ्याची दुरुस्ती पुन्हा गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात यावी,अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!