- जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुका विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभ सभेत आमदार अशोकराव माने यांच्या सून व माजी नगराध्यक्षा डॉ.नीता माने यांनी केलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे.जयसिंगपूर राजीव गांधी नगर ७ वी गल्ली येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेची जागा एका माजी नगरसेवकांनी विकल्याचा आरोप सभेत करताना,त्या पैशातून हॉटेल उभारले असल्याचा दावा त्यांनी केला.अशा व्यक्तींना पुन्हा सभागृहात पाठवू नये,अशी मागणीही त्यांनी उपस्थितांसमोर केली.या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी नगरसेवक बजरंग खामकर यांनी तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली.सदर जागेशी माझा कोणताही संबंध नाही.या जागेसंदर्भातील व्यवहार विद्यमान आमदार अशोकराव माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केला आहे.त्यांनी नागरिकांना रीतसर सभासद करून प्लॉट विकले आहेत,असा दावा खामकर यांनी केला.या सर्व प्रक्रियेची संपूर्ण माहिती स्वतः आमदार माने यांना असल्याचा दावा त्यांनी केला.तथ्य माहिती माहित असूनही डॉ. नीता माने अज्ञानातून आरोप करत आहेत, अशी टीका करत खामकर यांनी दोघांनाही खुले आव्हान दिले आहे.उद्या सकाळी ११ वाजता सासऱ्यांना घेऊन राजीव गांधी नगरमध्ये या.कोण जमिनी विकल्या, कोण पैसे घेतले याचे दूध- पाणी,पाणी- पाणी करू,’ असे थेट आव्हान त्यांनी दिल्याने परिसरातील राजकीय वातावरण आणखी चांगलेच तापले आहे.या आरोप- प्रत्यारोपांमुळे निवडणूक दौऱ्यातील राजकीय समीकरणे अधिक चुरशीची होत असून,यापुढे याबाबत कोणते नवे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.