शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे.या प्रभागात शहरातील दोन प्रमुख पाटील कुटुंबांमध्ये थेट लढत होत असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे पुतणे पद्मसिंह पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यातील सामना यंदाच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरत आहे.विशेष म्हणजे,गत निवडणुकीत हे दोघे एकाच गटात होते.मात्र यावेळी प्रथमच दोघे आमने–सामने येत असल्याने वर्चस्वाची कसोटी कोण जिंकणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाटील समाजाचे लक्षणीय वर्चस्व असून युवकांची संख्या देखील मोठी आहे.त्यामुळे युवकांच्या संघटनांची भूमिका यंदाच्या निवडणुकीच्या निकालावर निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर चिमासाहेब (CG) पाटील यांच्या भूमिकेची विशेष उत्सुकता होती.युवकांमध्ये त्यांची मजबूत पकड, समाजातील घनिष्ठ संपर्क आणि प्रभागातील कार्यकर्त्यांवरील प्रभाव पाहता त्यांचा निर्णय कोणाकडे झुकणार,याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू होते.अखेर चिमासाहेब (CG) पाटील यांनी अमरसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.त्यांच्या विजयासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.या निर्णयामुळे अमरसिंह पाटील यांचे पारडे अधिक जड झाल्याचे राजकीय समीक्षकांचे मत आहे. दोन्ही गटांमध्ये मोर्चेबांधणी वेगाने सुरू झाली असून प्रचाराचा वाढला आहे.शिरोळ नगरपरिषदेत पाटील समाजाचा राजकीय प्रभाव मोठा असल्याने प्रभाग क्रमांक ९ चा निकाल संपूर्ण तालुक्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे.त्यामुळे आगामी काही दिवसांत या प्रभागातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.