शिरोळ नगरपरिषद निवडणुक ; राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रभाग १ मधील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार मोहीमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आघाडीने सर्वसमावेशक प्रतिनिधित्वाला प्राधान्य देत नवीन,तरुण आणि कार्यक्षम चेहऱ्यांना संधी दिली आहे.गेल्या पाच वर्षांत शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली असून याची माहिती देत आघाडीच्या सर्व उमेदवारांना भक्कम बहुमताने निवडून द्यावे,असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.इंद्रायणी अमरसिंह पाटील यांनी मतदारांना केले.प्रभाग क्रमांक १ मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.श्वेता विश्वास काळे तसेच साजिद रमजान मुल्लाणी आणि सौ.शैलजा विजय पाटील यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान त्या बोलत होत्या.प्रचार दौऱ्यादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील पूर्ण झालेली तसेच प्रलंबित असलेली विकासकामे मतदारांसमोर मांडली.शहरातील रस्ते काँक्रीटीकरण,ड्रेनेज व्यवस्थेतील सुधारणा, पाणीपुरवठा प्रकल्प,स्वच्छता उपक्रम, सार्वजनिक उद्याने आणि विविध नागरिक सुविधा यांसह अनेक कामे पूर्ण करण्यात आपल्या आघाडीचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.उर्वरित प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहनही उमेदवारांनी मतदारांना केले.या संपर्क फेरीत स्थानिक नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत त्यांच्या कामकाजाचा सकारात्मक आढावा घेतला.शहरातील विकासाच्या गतीला गती देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आघाडीने दिलेल्या संधीमुळे युवा नेतृत्वाला बळ मिळेल,अशा प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केल्या.प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा आणि विकासाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.निवडणूक जवळ येत असताना राजर्षी शाहू विकास आघाडीचा प्रचार वेगाने सुरू असून,मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व दिसून येईल अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!