मुरगूड / प्रतिनिधी
संपूर्ण राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पेपर फुटीचा धडाका उडण्यापूर्वीच मुरगुड पोलिसांनी मोठी कारवाई करत एक गंभीर प्रकार उधळून लावला आहे.TET पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.या टोळीची व्याप्ती मोठी असून परस्परांशी जाळे जोडलेल्या आणखी व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.राज्यभर लाखो विद्यार्थी आणि शिक्षक उमेदवार परीक्षेला सामोरे जात असताना कोल्हापूरमध्येच पेपर फुटीच्या प्रयत्नाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.कागल तालुक्यातील सोनगे परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही उमेदवार तसेच काही शाळांतील शिक्षकाचाही समावेश आहे.या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.ताब्यातील सर्व आरोपी हे कागल आणि राधानगरी तालुक्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. काल सायंकाळपासून आज पहाटेपर्यंत पोलिसांनी सलग चौकशी आणि तपास सुरू ठेवला असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.पेपर फुटीसंदर्भातील माहिती, मिळालेल्या साधनसामग्रीचा तपास आणि आरोपींमधील परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी पथक कार्यरत आहे.दरम्यान, जिल्ह्यातील इतर केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडत असून पोलिसांनी नागरिक व परीक्षार्थींना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्यभर सुरू असलेल्या TET परीक्षेच्या पारदर्शकतेस तडा जाऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सजग असून पुढील काही तासांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.