शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून हैदरअली मिस्त्री यांना राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली असून,या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी नव्या नेतृत्वाला संधी देत मिस्त्री यांच्यावर विश्वास दाखवल्याने स्थानिक पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.मिस्त्री कुटुंबियांचे शिरोळ शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या राजकीय वारशाला योग्य न्याय देण्याचे काम पाटील यांनी केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीने यंदाच्या निवडणुकीत तरुणाईला मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नव्या, ऊर्जावान आणि सामाजिक भान असलेल्या उमेदवारांना पुढे आणण्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे.या माध्यमातून विविध समाजघटकांतील युवकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याने शिरोळकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यावेळी बोलताना प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार हैदरअली मिस्त्री म्हणाले,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील (भैया) यांनी एका मुस्लिम कुटुंबातील सामान्य युवकावर विश्वास ठेवून मला नेतृत्वाची जबाबदारी दिली,ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे.राजर्षी शाहू विकास आघाडीतर्फे शिरोळ शहरात सर्वसमावेशक,तरुण आणि तडफदार उमेदवार उभे करण्यात आले आहेत.शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा संकल्प असून लोकांच्या विश्वासाला जागण्याचा मी प्रयत्न करीन.मिस्त्री यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वारसा,सामाजिक कार्य,स्वच्छ प्रतिमा असल्याने त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा,स्वच्छता,रस्ते, पाणीपुरवठा तसेच युवकांसाठी रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर सकारात्मक कामगिरी करण्याची मिस्त्री यांची तयारी असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मोठा जनाधार मिळत आहे.