शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या २०२५ च्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच सुरू झाली असून नगराध्यक्ष पदासाठी यंदा चार उमेदवार रिंगणात आहेत.शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.यामध्ये माजी उपनगराध्यक्षा सौ.करुणा जनार्दन कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत रंगतदार निवडणुकीची सुरूवात केली आहे.सौ.कांबळे या नगरपरिषदेतील गत पंचवार्षिक कार्यकाळात प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आणि विविध विकासकामांमध्ये सहभाग,नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याचा प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकी यावर त्या पुन्हा एकदा जनतेसमोर जात आहेत.आम्ही केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार असून मतदारांनी याला योग्य न्याय द्यावा,असे आवाहन सौ.कांबळे यांनी केले आहे.शिरोळ शहरात निवडणूक चांगलीच गाजत असून विविध पक्षांच्या उमेदवाराकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे.अनेक उमेदवार आगामी काळात ‘मोठ- मोठी कामे’ करण्याचे आश्वासन देत प्रचार करत आहेत.मात्र सौ.करुणा कांबळे या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्षात केलेल्या कामांवर भर देत जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्या उमेदवारीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा प्रचार अधिक उत्साहात पार पडत असून नागरिकांशी थेट संवाद,घराघरातील भेटी,पूर्ण झालेल्या कामांची माहिती देत त्या मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी अंतर्गत हालचाली सुरू केल्या आहेत.यंदाची शिरोळ नगरपरिषद निवडणूक चुरशीची ठरणार असून मतदार कोणावर विश्वास टाकतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सौ.करुणा कांबळे यांच्या उमेदवारीने सर्वच उमेदवारांना आपली रणनीती नव्याने आखावी लागत आहे.दरम्यान चिन्ह वाटपानंतर प्रचाराला अधिक वेग येणार असून निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.