कुरुंदवाड / प्रतिनिधी
पुणे–बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या ५१ वी कोल्हापूर रेंज क्रीडा स्पर्धा २०२५ अत्यंत उत्साहात पार पडली. कोल्हापूर,पुणे ग्रामीण, सांगली,सातारा,सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण या पोलीस दलातील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उच्च दर्जाची कामगिरी सादर केली.विविध विभागांमधील खेळाडूंमध्ये उल्लेखनीय स्पर्धा पाहायला मिळाली.या स्पर्धेत सांगली जिल्हा पोलीस खेळाडू संघाने उत्कृष्ट खेळ करत सिल्वर पदकाची कमाई केली. संघातील खेळाडूंनी संघभावना,जिद्द आणि शिस्त या बरोबरच कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.सांगली संघात कुरुंदवाडचे राष्ट्रीय खेळाडू नामदेव कमलाकर, सनी मोहिते,तसेच शिरोळ गावचे उमेश माने गावडे यांनी महत्वपूर्ण योगदान देत संघाला उत्तम यश मिळवून दिले.खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.उच्च पातळीवरील या निवडीमुळे खेळाडूंमध्ये उत्साह तर वाढलाच, पण जिल्हा पोलीस दलासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.सांगली जिल्हा पोलीस टीममधील सर्व खेळाडूंचे तसेच या तीनही उल्लेखनीय खेळाडूंचे साधना मंडळ तर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना,अधिक मेहनत घेऊन राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतही यशाची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळून पुढील पिढीसाठी प्रेरणा मिळणार असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.