शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्याने आणि श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रमुख मार्ग (प्रजिमा) ९२ वरील मजरेवाडी पेट्रोलपंप ते श्री गुरुदत्त साखर कारखाना या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.दोन महिन्यांपासून सुरू असलेले हे काम आता मार्गावर सुरळीत वाहतूक सुरू होण्यास कारणीभूत ठरले असून स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी,विद्यार्थी, कामगार यांच्यात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्यामुळे आणि अवजड वाहनांच्या मोठ्या वहिवाटीमुळे या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे निकृष्ट झाले होते. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडून रस्ता खचल्याने वाहतूक धोकादायक बनली होती. शेतकरी आणि कामगार वर्गाला कारखान्याकडे जाताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी श्री गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती.या मागणीची दखल घेत श्री घाटगे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा महत्त्वाचा प्रश्न निकाली काढला.राज्याच्या सन २०२४–२५ अर्थसंकल्पात प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९२ वरील मजरेवाडी पेट्रोलपंप ते गुरुदत्त साखर कारखाना हा रस्ता साडेसात मीटर रूंदीने काँक्रिटीकरण करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.निधी प्राप्त होताच तात्काळ कामाला सुरुवात झाली आणि अल्पावधीत रस्त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले.नवीन रस्ता तयार झाल्यानंतर वाहनधारक, दुचाकीस्वार,विद्यार्थी तसेच कारखान्याकडे जाणाऱ्या अवजड वाहने,सर्वांचीच वाहतूक आता सुरळीत आणि सुरक्षित झाली आहे.काम नियोजित मुदतीत पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून यामुळे परिसराच्या विकासालाही चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.स्थानिकांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतल्याबद्दल श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे तसेच हे काम मंजूर करून देत वेगवान मार्गदर्शन केलेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.या विकासकामामुळे मजरेवाडी परिसरासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून आगामी काळात अशाच सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.