शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहराला भेडसावणाऱ्या सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा विल्हेवाट,रस्त्यांची दुरवस्था,महिलांसाठी उद्योग व्यवसायाच्या संधी अशा प्रमुख प्रश्नांवर समाधानकारक उपाययोजना करण्यास ताराराणी आघाडी कटिबद्ध असून, “प्रत्येकाला घर आणि घरातील प्रत्येक व्यक्तीस काम” हे आमचे ठाम व्हिजन असल्याचे प्रतिपादन शिरोळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.सारिका अरविंद माने यांनी केले. प्रभाग क्रमांक १० मधील मतदारांच्या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला.आजच्या जनसंपर्क मोहिमेत सौ.माने यांनी प्रभागातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता यासंबंधी नागरिकांकडून माहिती घेतली.वाढत्या लोकसंख्येनुसार शहरात सक्षम घनकचरा व्यवस्थापन उभारणे,सांडपाणी प्रक्रियेसाठी आधुनिक सुविधांची निर्मिती करणे तसेच सुरक्षित व स्वच्छ शिरोळ घडवणे हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योग–व्यवसाय,स्वयंरोजगार आणि प्रशिक्षण उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी मतदारांना आश्वस्त केले.शहरातील मूलभूत सुविधा उभारणीसोबतच कल्लेश्वर तलाव परिसराचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचा उल्लेख करत,येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प सौ.माने यांनी व्यक्त केला.हा प्रकल्प शिरोळ शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ताराराणी आघाडीला सर्वच प्रभागांतून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विकासाच्या दिशेने जनतेचा विश्वास असल्याचे सांगत सौ.माने म्हणाल्या की,शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आणि वचनबद्ध आहोत. जनसंपर्कादरम्यान महिलांसह ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदारांनीही त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.