शिरोळ नगर परिषदेची निवडणूक : प्रभाग १ मध्ये सौ.सुनिता विनायक साळुंखे यांच्या उमेदवारीला मतदारांचा पाठिंबा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये यंदा स्थानिक उमेदवारालाच संधी मिळावी,या मागणीचे मोठे रूपांतर मतदारांच्या निर्धारात झाले आहे.पुष्पक नगर आणि यादव नगर येथील मतदारांनी यावेळी स्वतःच्या प्रभागातील,स्थानिक पातळीवर समस्या जाणणाऱ्या सक्षम उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील नागरिकांना रस्ते,गटारे,पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सुविधांसंबंधी विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या वारंवार मांडूनही योग्य तो वेगाने निपटारा होत नसल्याने मतदारांमध्ये नाराजी होती.विशेष म्हणजे, प्रत्येक निवडणुकीत स्थानिकतेशी संबंध नसलेले ‘उपरे उमेदवार’ दिल्याबद्दल मतदारांनी असंतोष व्यक्त केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभागाला स्वतःचा,येथेच राहणारा,समस्या जाणणारा आणि त्यावर काम करणारा उमेदवार मिळावा,अशी मागणी वाढत होती.या पार्श्वभूमीवर यावेळी ताराराणी आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका पदासाठी सौ. सुनिता विनायक साळुंखे यांची अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागातील मतदारांनी समाधान व्यक्त करत स्थानिक उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.सुनिता साळुंखे या प्रभागातीलच रहिवासी असल्याने नागरिकांच्या रोजच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि प्रलंबित कामांची त्यांना चांगली जाण आहे, अशी मतदारांची भावना आहे.मतदारांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवायचे असतील,तर निर्णयक्षमता असलेला आणि आपल्या भागाशी नाळ जुळलेला उमेदवार असायलाच हवा.स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी एकदिलाने उभे राहण्याचा मतदारांचा निर्धार दिसत असल्याने या प्रभागातील निवडणूक अधिकच उत्सुकतेची बनली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!