प्रभाग १० मधील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देणार – श्रीवर्धन माने देशमुख

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सांडपाणी प्रकल्पामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दुर्गंधी,डासांचे वाढते प्रमाण, दूषित हवा,तसेच पाणीप्रदूषणाची समस्या यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार वारंवार पुढे येत आहे.श्वसनाचे विकार,त्वचारोग,डोळ्यांचे आजार यांसह अनेक प्रकारच्या आजारांना येथे राहणाऱ्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील ताराराणी आघाडीचे उमेदवार श्रीवर्धन माने देशमुख यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.दसरा चौक परिसरातील घनकचरा व सांडपाणी प्रकल्प हे या भागाच्या मध्यवर्ती जागेत असून घरांच्या शेजारी उभे असल्याने नागरिकांचे जगणे अक्षरशः कठीण झाले आहे. या प्रकल्पांमुळे निर्माण होणारी दुर्गंधी व प्रदूषणामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या संवेदनशील मुद्द्याला हात घालताना श्रीवर्धन माने देशमुख म्हणाले की,या दोन्ही प्रकल्पांमुळे प्रभागातील रहिवाशांचे जगणे अवघड झाले आहे.हा प्रश्न केवळ सोयी-सुविधांचा नसून थेट नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे.त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घेऊन हे प्रकल्प दसरा चौकातून बाहेर नेण्यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे.तसेच त्यांनी पुढे बोलताना प्रभागातील सर्व सकारात्मक घटकांना एकत्र आणून प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज असल्याचे सांगितले. नागरिकांनी मला साथ दिली, तर हा प्रश्न निश्चित सोडवला जाईल.प्रभागातील प्रत्येक मतदार हा माझा सोबती आहे.त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हीच माझी प्राथमिकता असेल,असे आश्वासनही त्यांनी दिले.नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष पाहण्यासाठी श्रीवर्धन माने देशमुख यांनी या परिसरात भेटी सुरू केल्या असून अनेक ठिकाणी रहिवाशांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत.विविध वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकही या प्रश्नाच्या निकाली तोडगा निघेल,अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!