शिरोळ / प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक तीनमध्ये आंदोलन अंकुश संघटनेच्या उमेदवार सौ.संगीता भारत ढाले यांनी मतदारांशी संवाद साधताना मूलभूत सुविधा,आरोग्य,स्वच्छता आणि सुशोभीकरण या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भक्कम काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासन व नगरपरिषदेमार्फत मिळणाऱ्या सर्व योजना पोहोचवून त्याचा लाभ देणे हा माझा प्रमुख उद्देश आहे, असे सौ.ढाले यांनी स्पष्ट केले.कल्लेश्वर तलाव व परिसराच्या विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या,कल्लेश्वर तलाव परिसरातील स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि तलावाच्या संरक्षणासाठी नासद्वारे पारदर्शक, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण काम केले जाईल. या कामावर मी स्वतः लक्ष ठेवून प्रभागासाठी हे ठिकाण आकर्षणाचे व सुरक्षित होईल याची खात्री देईन.प्रभागातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन अडचणींबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली. रस्त्यांची दुरवस्था,गटारांची स्वच्छता, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्थेतील त्रुटी, घंटागाडीची अनियमित ये-जा अशा तक्रारी वारंवार येत असल्याचे मतदार सांगतात. यावर प्रतिक्रिया देताना सौ.ढाले म्हणाल्या,गल्लीत किंवा भागात कोणतीही अडचण नागरिकांनी एकदा कळवली तरी पुढील पाच वर्षांत त्या कामाची पुन्हा तक्रार येणार नाही, अशी जबाबदारी मी स्विकारते.प्रभागातील वार्डस्तरावरील विकासकामांसाठी ओपन जिम, बाग-बगीचा,सुशोभीकरण व नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.तसेच कचेरी ते कारखाना मेन रोड रुंद,मजबूत आणि सुरक्षित करण्याचे काम पहिलेच हाती घेण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला.शिक्षण क्षेत्रातील गरजांवरही त्यांनी चर्चा केली.भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नगरपरिषदेच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी त्या प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रभागातील सर्वांत गंभीर समस्या असलेल्या पाण्याच्या तुटवड्याबद्दल सौ.ढाले यांनी विशेष चिंता व्यक्त केली. नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करून दीर्घकालीन उपाययोजना राबवली जाईल,असे त्यांनी आश्वासन दिले.प्रभाग क्रमांक तीनचा सर्वांगीण,पारदर्शक आणि सातत्यपूर्ण विकास करण्याचे आश्वासन देत त्यांनी नागरिकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.