शिरोळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ.करुणा कांबळे यांचा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झालं असून माजी उपनगराध्यक्षा सौ.करुणा जनार्दन कांबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.“ना पक्ष, ना गटबाजी… फक्त शिरोळकरांचा विश्वास आणि सर्वांगीण विकास! एकत्र येऊया, बदल घडवूया!” अशी घोषणा देत त्यांनी निवडणूक रिंगणात उतरल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.सौ.कांबळे या गत पंचवार्षिक निवडणुकीनंतरच्या कार्यकाळात उपनगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.या काळात नगरपरिषदेमार्फत राबवण्यात आलेल्या अनेक विकासाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.शहरातील मूलभूत सुविधा,स्वच्छता उपक्रम,पिण्याच्या पाण्याच्या नियोजनातील सुधारणा, नागरिक संपर्क वाढवणे आदी कामांमध्ये त्यांनी तत्परता दाखविल्याचे सहकाऱ्यांचे मत आहे.या अनुभवाच्या बळावर नगराध्यक्ष पदासाठी जनतेचा अभिप्राय आणि पाठिंबा मिळेल,असा त्यांचा विश्वास आहे.शिरोळचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा गटाचा विषय नसून सर्व नागरिकांच्या संयुक्त सहभागातूनच तो साध्य होऊ शकतो. माझ्या कार्यकाळात जे काम सुरू केले, त्याला विस्तृत दिशा देण्यासाठी आणि नवीन उपक्रम राबवण्यासाठी मी पुन्हा आपल्या सेवेसाठी पुढे येत आहे,असे सौ.कांबळे यांनी सांगितले.अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवरील सन्माननीय व पारदर्शक राजकारणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या शिरोळ नगरपरिषद क्षेत्रात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांची भेटीगाठी, मतदारांशी संवाद आणि निवडणूक रणनीती यांना सुरुवात झाली आहे.कांबळे यांच्या उमेदवारीनंतर महिला मतदार,युवक आणि विविध प्रभागांतून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरेल,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या उमेदवारी घोषणेमुळे शिरोळ नगरपरिषद निवडणूक २०२५ अधिक रंगतदार होणार असून आगामी काही दिवसांत निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!