पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करून शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढवणाऱ्या शिरोली हायस्कूल, शिरोली पुलाची येथील 14 वर्षाखालील कबड्डीपटूंचा भव्य सत्कार सोहळा शाळेच्या प्रांगणात अत्यंत दिमाखात पार पडला. या यशस्वी खेळाडूंच्या सन्मानार्थ शिरोली परिसरातून भव्य मिरवणूक आणि सायकल रॅलीचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक एम.एस. स्वामी यांनी, “कबड्डीच्या मैदानावर खेळाडूंनी दाखवलेली धडाडी, संघ भावना आणि चिकाटी ही आजच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे, हा सन्मान म्हणजे “कष्ट, मेहनत आणि संघभावनेचा गौरव आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन सुरेशराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खेळाडूंच्या यशाचे महत्त्व अधोरेखित केले. “राज्य व राष्ट्रीय कबड्डीमध्ये खेळाडूंनी मिळवलेले यश हे शिरोली हायस्कूलच्या क्रीडा इतिहासात अभूतपूर्व आहे आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले कष्ट, मेहनत, सराव आणि प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन यामुळेच हे भव्य-दिव्य यश खेचून आणले आहे.” असे प्रतिपादन केले.यावेळी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या अवधूत सोडगे, अर्जुन माने, विराज बोळाज तसेच, राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त करून चमकदार कामगिरी करणाऱ्या स्वयंम पाटील, राजवीर पाटील, समर्थ अवघडे, सिद्धार्थ कोरवी, प्रज्वल माळी, रुद्र झांजगे, शौर्य कोळी, सत्यजित कांबळे,अजिंक्य बेडगे या विद्यार्थ्यांचा व जिमखाना विभाग प्रमुख आर. एस. पाटील, एन आय एस कोच दीपक पाटील, प्रशिक्षक नामदेव गावडे, संभाजी गावडे, कुबेर पाटील, आर. एम. मारापुरे, सचिन कोळी आणि नितीन पदमाई यांचाही विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभास संस्थेचे चेअरमन सुरेशराव पाटील, अध्यक्ष सलीम देसाई, सेक्रेटरी कृष्णात खवरे, संचालक श्रीकांत पाटील, मुख्याध्यापक मा. एम.एस.स्वामी,संकल्पच्या मुख्याध्यापिका सौ. अश्विनी यादव, एस.एस.पाटील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर. एम. मारापुरे यांनी केले, तर श्री. एन. वाय. पदमाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.