“मोठी बातमी” दत्त साखरच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिका निवडणुकीत भाग घेऊ नये..! कारखाना प्रशासनाकडून स्पष्ट आदेश

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना प्रशासनाने उद्योगसमूहातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कडक सुचना देत एक परिपत्रक जारी केले असून,आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की,आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. निवडणूक काळात सहकारी संस्थेतील कर्मचारी राजकीय गतिविधींपासून दूर राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याने निवडणूक प्रचार, सभा, पदयात्रा, मोर्चे किंवा राजकीय कार्यक्रमात सहभागी होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.याशिवाय, कारखान्याच्या इमारतीवरील किंवा आवारातील कोणतेही पोस्टर्स, बॅनर्स किंवा राजकीय स्वरूपाचे साहित्य त्वरित काढण्यास सांगण्यात आले आहे. संस्थेच्या इमारतीच्या आतील भागात एखाद्या मंत्र्यांचे किंवा राजकीय नेत्यांचे फोटो असल्यास तेही तत्काळ हटवावेत, असे परिपत्रकात नमूद केले आहे.संस्थेची स्थावर व जंगम मालमत्ता जसे की इमारत, कार्यालयीन साधने, टेलिफोन, टायपिंग, झेरॉक्सची सुविधा, वाहने किंवा अतिथीगृह निवडणूक कामासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला या सुविधांचा लाभ देता कामा नये, अशी कठोर भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली आहे.तसेच संस्थेच्या निधीचा थेट किंवा अप्रत्यक्षपणे नगरपालिका निवडणूक २०२५ मध्ये वापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सर्व विभागप्रमुखांना देण्यात आली असून,आचारसंहिता लागू असताना कारखाना प्रशासन पूर्णपणे तटस्थ राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या निर्देशांमुळे निवडणूक काळात कारखान्यात शिस्तीचे आणि तटस्थतेचे वातावरण राखले जाईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!