शिरोळ नगर परिषदेतील निवडणूक ‘एकला चलो रे’च्या नार्‍यात; पॅनेल टू पॅनेल मतदानावर प्रश्नचिन्ह 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अद्याप जाहीरही झाली नसतानाच सर्वच आघाडीतील संभाव्य उमेदवारांनी ‘एकला चलो रे’चा नारा देत स्वतंत्र प्रचाराला सुरुवात केली आहे.प्रभाग पातळीवर सोशल मीडियावर उमेदवारांचे केवळ स्वतःचे फोटो,‘मला एक मत द्या’ असे आवाहन आणि वैयक्तिक पातळीवरील प्रचाराची जोरदार लाट दिसत आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मतदानाची परंपरा यंदा ढासळण्याची चिन्हे राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहेत.शहरातील अनेक प्रभागांत सध्या सोशल मीडियावर फक्त एका व्यक्तीचेच पोस्टर किंवा प्रचार व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात कुठेही आघाडीतील इतर सहकारी उमेदवारांचा किंवा पॅनेलचा उल्लेख नाही.त्यामुळे प्रभागातील मतदारांमध्ये एकच प्रश्न उपस्थित झाला आहे.यंदाची निवडणूक ही पॅनेलवर की व्यक्तिमत्त्वावर? राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रभागात उमेदवारांची वैयक्तिक ओळख,त्यांच्या कामांचा ठसा आणि घराघरातील संपर्क याला मतदार अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत पॅनेलचे गणित गुंतागुंतीचे होऊ शकते.आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र आपापल्या कार्यकर्त्यांना पॅनेलची ताकद सांगण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.तरीदेखील प्रभागात “एक मत मला” हा सूर प्रबळ असल्याने पॅनेलमधील आंतरिक समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एखाद्या प्रभागातील उमेदवाराला अपेक्षित तितकी साथ मिळाली नाही,तर त्याचा थेट फटका संपूर्ण पॅनेलच्या आकडेमोडीवर बसू शकतो.परिणामी,आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल की नाही, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.शहरातील जनतेमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.प्रत्येक जण स्वतःला जिंकवण्याच्या आटापिट्यात असल्याने संपूर्ण पॅनेल जिकेल का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येईल; मात्र त्यात पॅनेलचा सूर लागतो की वैयक्तिक मोहिमेचा नारा अधिक ठळक होतो, यावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!