शिरोळ / प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य,परवडणारा आणि हमीभावाचा दर मिळावा या मागणीसाठी गेल्या काही वर्षांत आवाज उठवला असला तरी आंदोलनाच्या रेट्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, अशी खंत आंदोलन अंकुश संघटनेने व्यक्त केली आहे.ऊस दरासाठी सातत्याने, प्रामाणिक आणि आक्रमक पद्धतीने लढा देणारी संघटना म्हणून आंदोलन अंकुश संघटनेची ओळख निर्माण झाली असून, त्याच लढाऊ विचारांची कास धरून संघटनेचा शिलेदार कृष्णा देशमुख शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरला आहे.शेतकऱ्यांच्या घामाचे दाम मिळावेत, ऊस दरासाठी भविष्यात अधिक सक्षम आणि संघटित नेतृत्व निर्माण व्हावे, यासाठी या निवडणुकीत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका बजावण्याची गरज असल्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.ऊस दराच्या प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी अग्रभागी असणारा तरुण नेता म्हणून कृष्णा देशमुख यांची ओळख असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.कृष्णा देशमुख यांना राजकीय बळ मिळाल्यास ऊस उत्पादकांच्या मुद्द्यांना अधिक सक्षम आवाज मिळेल आणि भावनुवर नव्हे तर संघर्षावर आधारित नेतृत्व स्थानिक राजकारणात निर्माण होईल,असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.ऊस दराचा लढा अधिक बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी या निवडणुकीत उपलब्ध झालेल्या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून अस्तित्वाचा आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या हितासाठी काम करणारा प्रतिनिधी निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत कृष्णा देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,अशा शब्दांत आंदोलन अंकुश संघटनेने शेतकरी बांधवांना आवाहन करत ऊस दराच्या लढ्याला नवी दिशा देण्याचे आवर्जून आवाहन केले आहे.