शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच विविध आघाड्यांच्या हालचालींना वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमधून ओबीसी महिला प्रवर्गासाठी अश्विनी संभाजी आरगे यांनी ताराराणी आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.समर्थकांसह शिरोळ तहसील कार्यालयात पोहोचत आरगे यांनी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण केली.अर्ज दाखल करण्यासाठी आरगे यांच्यासोबत ताराराणी आघाडीचे पदाधिकारी,स्थानिक कार्यकर्ते आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना अश्विनी आरगे म्हणाल्या,प्रभागाचा सर्वांगीण विकास,महिला आणि युवकांसाठी उपयुक्त उपक्रम, तसेच मूलभूत सुविधांचे बळकटीकरण हे आमचे प्रमुख ध्येय असणार आहे.नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.प्रभाग क्रमांक पाच हे नगर परिषदेतील महत्वाचे प्रभाग मानले जाते.वाढती लोकसंख्या, रस्त्यांची आवश्यकता,पाणीपुरवठा,स्वच्छता अशा विविध स्थानिक प्रश्नांवर लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.या पार्श्वभूमीवर तरुण आणि सक्रिय उमेदवार म्हणून आरगे यांची निवडणूक मैदानातील उपस्थिती चर्चा विषय ठरत आहे.अर्ज दाखल करण्याच्या दिवशी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले होते. आगामी काळात प्रचार मोहिमेला वेग येणार असून, घराघरात जाऊन प्रभागातील प्रश्नांची जाण करून घेण्याचा मानस असल्याचे आरगे यांनी सांगितले.ताराराणी आघाडीच्या स्थानिक नेतृत्वानेही त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करत विजयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत या प्रभागाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.