शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून प्रवीण संभाजी खाडे यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.दीर्घकाळ सामाजिक कार्य,जनसंपर्क आणि विविध चळवळींमधील सक्रिय सहभाग या बळावर खाडे यांच्या उमेदवारीकडे प्रभागातील मतदारांचे विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे.शिवसेनेत वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी प्रवेश केलेल्या प्रवीण खाडे यांनी तब्बल २५ वर्षे पक्षनिष्ठ राहून संघटन बांधणी,ग्रामस्तरावरील प्रश्न सोडवणे आणि जनतेशी संवाद वाढवण्याचे काम सातत्याने केले आहे.१५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या श्रीवर्धन दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक शेतकरी, महिला स्वयंसहाय्यता गट आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित कुटुंबांशी थेट संपर्क प्रस्थापित केला.या उपक्रमामुळे प्रभागातील अनेकांना शाश्वत उत्पन्नाचा आधार मिळाला असून खाडे यांची “लोकांशी नाळ जुळलेला नेता”अशी ओळख निर्माण झाली आहे.माजी आमदार उल्हासदादा पाटील यांच्या कार्यशैलीचे ते कट्टर अनुयायी असून नगराध्यक्ष अमरसिंग माने-पाटील यांच्याशी असलेली जवळीकही त्यांच्या राजकीय प्रवासाला बळकटी देणारी ठरली आहे.प्रभागातील तक्रारी, घरगुती व शेतीसंबंधित वाद-विवाद शांतपणे, समजूतदारपणाने मिटवण्याचे त्यांचे कौशल्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.शेतकरी आंदोलनात आंदोलन अंकुशच्या माध्यमातून त्यांनी केलेली प्रखर भूमिका,तर दुसरीकडे शांत आणि संयमी स्वभाव यांचा संगम प्रवीण खाडे यांना इतर उमेदवारांपेक्षा वेगळे स्थान देतो.अडचण किंवा संकट कोणतेही असो लोकांच्या मदतीसाठी तत्पर धावून जाणे,मार्ग काढून देणे आणि समस्येचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याचे मतदार सांगतात.त्यामुळेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये “हक्काचा माणूस” म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रवीण खाडे यांनी जनतेच्या विकासासाठी निष्ठेने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.आगामी निवडणुकीत या प्रभागातील स्पर्धा चुरशीची होणार असली तरी खाडे यांच्या प्रवेशामुळे राजर्षी शाहू विकास आघाडीला बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळातील संकेत आहेत.