शिरोळात आमदार यड्रावकर व आमदार माने आमने- सामने, ९ वर्षांनी पुन्हा राजकीय सामना रंगणार..!

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.यड्रावकर बंधूंनी ९ वर्षांनी शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत आमदार अशोकराव माने यांना त्यांच्या होमपेजवर घेरले आहे.२०१६ सालचा राजकीय प्रसंग आजही शिरोळ तालुक्यातील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थक विसरलेले नाहीत.जयसिंगपूर हे यड्रावकर बंधूंचा बालेकिल्ला मानले जात असूनही आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या गडात घुसून त्यांच्या राजकारणाला पडझड करण्याचा प्रयत्न केला.या निवडणुकीत माने यांनी आपल्या सुनेला नगराध्यक्षपदावर बसवत यड्रावकरांना चितपट केले होते.त्या घटनेला आता नऊ वर्षे पूर्ण होत असताना यड्रावकर बंधूंना पुन्हा एक संधी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.सध्या शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत दोन्ही गट आमनेसामने आले असून राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी थेट आमदार अशोकराव माने यांना आव्हान देत श्वेता विश्वास काळे यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी माने यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान मानले जात आहे.दरम्यान,कुरुंदवाड आणि जयसिंगपूर नगरपरिषदांमध्ये यड्रावकर यांनी विविध विरोधकांना एकत्र आणत मजबूत राजर्षी शाहू विकास आघाडी उभी केली आहे.मात्र शिरोळ शहरात त्यांनी माने यांच्या विरोधात स्वतंत्रपणे राजकीय समीकरणे तापवली आहेत.विशेष म्हणजे मराठा जागेचा मुद्दा, तसेच “नेहमी घरातील व्यक्तीलाच उमेदवारी” या आरोपांमुळे या निवडणुकीला अधिक रंग चढला आहे.येत्या काही दिवसांत दोन्ही गटांतून आणखी घडामोडी समोर येण्याची दाट शक्यता असून शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे भाऊ संजय पाटील यड्रावकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!