शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये निवडणुकीचे तापमान चांगलेच वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकरी कुटुंबातील,रोजंदारी शेती करत सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे उमेश रावसो सावंत यांनी आज शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्या मित्रपरिवारासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. साधेपणा, कार्यतत्परता आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा स्वभाव या गुणांमुळे उमेश सावंत यांचा प्रभाग ६ मध्ये चांगला जनसंपर्क आहे.अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपली स्वतंत्र छाप निर्माण केली.त्यामुळेच त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग ६ मधील पारंपरिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.उमेदवारी अर्ज दाखल करताना शेतकरी बांधव, तरुण कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.उमेश सावंत यांनी यावेळी प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास,पाणीपुरवठा,रस्ते,स्वच्छता व्यवस्थापन,तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.उमेश सावंत यांच्या या दमदार प्रवेशामुळे अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग ६ मध्ये मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहता निवडणुकीत चुरस वाढण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.शिरोळ नगर परिषदेच्या या प्रभागात आता पुढील काही दिवसांत वातावरण अधिक रंगत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.