विरोधक ते सहकारी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाट्यमय राजकीय घडामोडी 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येताच शिरोळ तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.तालुक्यात अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात राजकीय बुरुज उभारणारे नेते आता एकत्र आले असून आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी नवे गणित आकारास येताना दिसत आहे.माजी आमदार उल्हास पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीची धुरा स्वीकारली आहे.

 

एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार म्हणून उदयास आलेले उल्हास पाटील आणि सावकर मादनाईक हे दोघेही अनेक वर्षांनंतर पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसत आहेत.शिरोळ तालुक्यात ऊस चळवळीपासून विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत अनेक वेळा हे नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते; मात्र आज ‘हम साथ साथ हैं’ असा संदेश तालुक्यात देताना दिसत आहेत.

उल्हास पाटील यांचा राजकीय प्रवास आणि अलीकडील कलाटणी

एकेकाळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उदयास आलेल्या उल्हास पाटील यांनी ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.पण 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी शिरोळ विधानसभा जिंकत विधानमंडळ गाठले.त्यावेळी यड्रावकर आणि सावकर मादनाईक हे दोघेही त्यांच्याविरोधात उभे होते.

राज्यातील राजकारणात झालेल्या बदलानंतर उल्हास पाटील यांनी उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेत नेतृत्वाची धुरा सांभाळली; परंतु 2024 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा अनपेक्षित कलाटणी देत स्वाभिमानीच्या तिकिटावर उमेदवारी जाहीर केली.मात्र शेट्टी यांच्या संघटनेत त्यांचे मन रमले नाही.ऊस उत्पादकांची मोठी अपेक्षा असतानाही जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली.या चर्चांना पूर्ण विराम देत अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.

 

सावकर मादनाईकांचा यड्रावकर यांना पाठींबा

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक हे भाजपाचे अनुभवी नेते मानले जातात. अनेक वर्षे ऊस चळवळीपासून राजकारणापर्यंत त्यांनी स्वाभिमानीसोबत पायपीट केली होती.यड्रावकर यांच्यासोबत त्यांचा राजकीय संघर्षही सर्वश्रुत आहे.तरीदेखील सध्याच्या नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला खुले समर्थन दिले आहे.महायुतीच्या घटक पक्षांसह या आघाडीने जयसिंगपूर,शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपालिकांच्या निवडणुकीत उतरले आहे.गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे.

विरोधक ते सहकारी—राजकीय नाट्यमय बदल

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ऊस चळवळीचे धुरंधर मानले जाणारे उल्हास पाटील आणि सावकर मादनाईक हे दोघे नेते आता यड्रावकर यांच्या नेतृत्वात एकत्र आल्याने तालुक्याचे राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे.2019 च्या विधानसभा निवडणुकीत यड्रावकर यांनी उल्हास पाटील यांचा पराभव करून आपली ताकद दाखवली होती.दोघांमधील वैचारिक आणि राजकीय मतभेद सर्वश्रुत होते. पण यंदाच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या निमित्ताने हे तिघेही एकाच व्यासपीठावर उभे ठाकले आहेत.शेतकरी संघटनांमधील वैचारिक मतभेद,विधानसभा लढतीतील संघर्ष, राजकीय आरोप-प्रत्यारोप यानंतर इतक्या वर्षांनी हे सर्व नेते एकत्र निवडणूक लढवताना दिसत असल्याने तालुक्यात या ‘नव्या मैत्री’ची जोरदार चर्चा आहे.

तालुक्यातील राजकीय अनुमानांना सुटले पंख

उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून तालुक्यात सुरू होत्या. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे यड्रावकर यांच्या आघाडीला महायुतीचे घटक पक्ष मजबूतपणे पाठिंबा देत असल्याने या निवडणुका तुफानी होणार यात संशय नाही. नगरपालिकांमध्ये उमेदवारांच्या चर्चेला वेग आला असून मतदारसंघांमध्ये समीकरणे वेगाने बदलत आहेत. तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते, हौशी विश्लेषक आणि मतदार या नव्या ध्रुवीकरणाबाबत तर्क-वितर्क मांडताना दिसत आहेत.

‘हम साथ साथ हैं’चा तालुक्यातील संदेश

राजकारणातील दुरावा आणि संघर्ष विसरून निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आलेले हे नेते आता तालुक्यात “हम साथ साथ हैं” चा संदेश देत आहेत.गेल्या दोन दशकांत कधीही एकाच मंचावर न दिसणारे हे तिघे आता तालुक्यातील नागरिकांसमोर एकत्र प्रचार करताना दिसण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!