निवडणुकीपूर्वी शाहू आघाडीला मोठी ताकद; ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांचा महायुतीला पाठिंबा

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड,जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुती राजर्षी शाहू विकास आघाडीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे.रविवारी सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे राज्य संघटक चंगेजखान पठाण,माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे तसेच कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू विकास आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला.या निर्णयामुळे तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांमध्ये महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.या प्रसंगी महायुतीत सामील झालेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिरोळ तालुक्यातील विकासकामांसाठी शाहू आघाडीच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले.येणाऱ्या नगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला.त्यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असून विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.बैठकीत बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले नगरपालिका निवडणुकीत गट-तट न पाहता शहराच्या सर्वांगीण विकासाला आमचे प्राधान्य आहे.शहराच्या प्रगतीसाठी जे लोक विश्वासाने आमच्यासोबत येत आहेत त्यांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.विकासाच्या राजकारणासोबतच स्थिर नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.या बैठकीला ठाकरे गट व शाहू आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यामध्ये रामचंद्र डांगे, जवाहर पाटील,चंद्रकांत जोंग,दीपक गायकवाड,अजित देसाई,उदय डांगे,बाळासो गायकवाड आदींचा समावेश होता.सर्व नेत्यांनी आगामी निवडणुका विकासाधिष्ठित करण्याचा संकल्प व्यक्त केला.शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये झालेल्या या ऐतिहासिक बदलामुळे तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुका आता अधिक निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत.महायुती राजर्षी शाहू आघाडीच्या बाजूने निर्माण झालेली ही नवीन शक्ती निवडणुकीवर मोठा परिणाम घडवेल,असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!