शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ९ रंगतदार ; पद्मसिंह पाटील व अनुराधा गुरव यांचे उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना प्रभाग क्रमांक ९ मध्येही निवडणूक चुरशीची झाली आहे.शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनल तर्फे पद्मसिंह प्रकाशराव पाटील आणि सौ.अनुराधा शक्तीजीत गुरव यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून,दोन्ही उमेदवारांच्या प्रवेशामुळे प्रभागातील वातावरण अधिक उत्साही झाले आहे.प्रभाग ९ मधून उच्चशिक्षित, तरुण आणि तडफदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने युवा वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.पद्मसिंह पाटील हे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे पुतणे असून,त्यांना मिळणारे राजकीय मार्गदर्शन आणि अनुभव हा त्यांचा मोठा भक्कम पाया मानला जात आहे.शिरोळ नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी कामकाजाचा अनुभव घेतल्याने प्रभागातील विविध समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची क्षमता मतदारांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला युवा मतदारांबरोबरच नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.तर दुसरीकडे, सौ.अनुराधा शक्तीजीत गुरव या ही उच्चशिक्षित असून महिलांसाठी, युवतींसाठी विविध उपक्रम राबवण्याचा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.संघटन कौशल्य,सामाजिक सहभाग आणि प्रभागातील महिलांशी असलेला दैनंदिन संपर्क यामुळे त्यांची ओळख सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून झाली आहे.त्यांचे पती शक्तीजीत गुरव यांचा सामाजिक व युवा संघटनातील अनुभवही त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या उमेदवारीला महिलांकडून आणि तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिव शाहू आघाडी प्रणित यादव पॅनलने प्रभाग ९ मधून तरुण व अनुभवी उमेदवारांना संधी दिल्याने संपूर्ण प्रभागात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.येत्या काही दिवसांत प्रचार मोहीम अधिक वेग घेणार असून प्रभाग ९ मधील निवडणूक ही या नगरपरिषदेच्या निवडणुकीतील महत्त्वाची लढत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!