शिरोळ विशेष / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ हा सर्वाधिक चर्चेत राहिलेला प्रभाग ठरत आहे.पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे पुतणे पद्मसिंह पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे पुतणे अजिंक्य पाटील यांची नावं प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत असल्याने या प्रभागात रंगतदार लढत अपेक्षित आहे.गत निवडणुकीत प्रताप उर्फ बाबा पाटील आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे एकत्र होते.मात्र यावेळी प्रथमच दोघे आमने-सामने येणार असल्याने वर्चस्वाची कसोटी कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रभाग क्रमांक ९ मध्ये पाटील समाजाचा प्रभाव लक्षणीय असून युवकांची मोठी उपस्थिती आहे.त्यामुळे या निवडणुकीत युवक संघटनांची भूमिका निकालावर मोठा प्रभाव टाकणार आहे.याच पार्श्वभूमीवर चिमासाहेब (CG) पाटील यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. युवकांचे मजबूत संघटन,समाजातील मोठा संपर्क आणि प्रभागातील कार्यकर्त्यांवरील प्रभाव या गोष्टींमुळे चिमासाहेब पाटील कोणाच्या पाठीशी उभे राहतात,हेच दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या विजयाचे समीकरण ठरू शकते,असा राजकीय वर्तुळात अंदाज वर्तवला जात आहे.प्रभागातील मतदारांमध्येही चिमासाहेब पाटील यांची भूमिका हा चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.ते माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या बाजूने उभे राहतील की प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या गटाला पाठिंबा देतील,याबाबत प्रभागातील युवा मतदार विशेष उत्सुक आहेत.दोन पाटील कुटुंबांत थेट लढत होत असल्याने निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे.शिरोळ नगरपरिषदेत पाटील समाजाचा राजकीय प्रभाव मोठा असल्याने प्रभाग क्रमांक ९ मधील निकाल संपूर्ण परिषदेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.दोन्ही गटाने मोर्चेबांधणी सुरू केल्याने आणि प्रचाराची लगबग वाढल्याने आगामी दिवसांत या प्रभागातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.शेवटी,चिमासाहेब (CG) पाटील यांच्या भूमिकेची अधिकृत घोषणा होताच या लढतीचे समीकरण स्पष्ट होईल,अशी प्रभागातील जनतेत चर्चा रंगली आहे.