मांत्रिक किशोर लोहार व अभिजित मोहिते यांची शिरोली पोलिसांनी काढली धिंड

Spread the love

 

शिरोली पुलाची / प्रतिनिधी 

शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मांत्रिक किशोर लोहार व त्याचा सहकारी अभिजित बाबासो मोहिते यांना शिरोली पोलिसांनी शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.सुमारे 15 दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी किशोर लोहार तसेच अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण करणारा अभिजित मोहिते यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. अटकेनंतर त्यांना न्यायालयात प्रथमच हजर करण्यात आले असता,पुढील तपासासाठी एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. या कालावधीत आरोपींकडून आणखी काही संशयास्पद माहिती मिळते का, याची तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू होती.शुक्रवारी पुन्हा न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले असता, तपासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याने न्यायालयाने दोघांनाही पुन्हा एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणात कोणतेही अंधश्रद्धा,दहशत निर्माण करणारे प्रकार किंवा दिशाभूल करणारी कृत्ये झाली आहेत का,याबाबत पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.कोठडी सुनावल्यानंतर शिरोली पोलिसांनी लोहार व मोहिते यांना गावातून फिरवत धिंड काढली. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविणाऱ्या, भय निर्माण करणाऱ्या व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या धिंडीद्वारे पोलिसांनी ग्रामस्थांना दिला.या घटनेमुळे शिरोली परिसरात चर्चांना उधाण आले असून, पोलिसांनी दाखवलेल्या कडक भूमिकेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील चौकशीत आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!