प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल झाली असून, प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलत सत्तेच्या गाठी बांधणारे माजी आमदार उल्हास पाटील यांनी आता शिंदे गटाचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.आगामी शिरोळ नगर परिषद आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडीमुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.उल्हास पाटील यांनी गेल्या काही वर्षांत वारंवार पक्षबदल करत स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्न केले आहेत. २०१४ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अन्याय झाला म्हणून बाहेर पडत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करून आमदारकी मिळवली. मराठा आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना आमदार करण्यासाठी खांदे दिले,मात्र सत्तेत आल्यानंतर त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.परिणामी २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.दरम्यान,अपक्ष म्हणून निवडून आलेले डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर आरोग्य राज्यमंत्रीपद भूषवले.मात्र पुढे झालेल्या बंडानंतर त्यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला.या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये पुन्हा उल्हास पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली; परंतु मतदारांनी त्यांना दणदणीत पराभव दिला.आता पुन्हा स्वाभिमानी संघटना सोडून थेट राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या यड्रावकर यांच्यासोबत त्यांची गळाभेट झाल्याने कार्यकर्त्यांत नाराजीचा विस्फोट झाला आहे.“सत्ता मिळवण्यासाठीच कोल्हाट्या उड्या मारणारे नेते” अशी चर्चा गावोगावी रंगू लागली आहे.मराठा आणि बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.उल्हास पाटील यांची ही नवी राजकीय चाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कसा परिणाम करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र वारंवार पक्षबदल केल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,“सत्ता की समाज?” असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.