प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिरोळ नगरपालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घ्यायचीच असा चंग बांधत आमदार यड्रावकर सध्या शिरोळ शहरात तळ ठोकून आहेत.दरम्यान,अनेक राजकीय हालचालींना वेग आला असून, फोडाफोडीचे राजकारण रंगात आले आहे.दत्त कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील यांचे निकटवर्तीय आणि जनसंपर्क अधिकारी विश्वास उर्फ दादा काळे यांच्या पत्नी श्वेता काळे यांना थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत आमदार यड्रावकर यांनी आपल्या गटात सामील करून घेतले आहे.यामुळे यड्रावकर गटाची निवडणुकीतील ताकद अधिक वाढली आहे.विशेष म्हणजे, यड्रावकर यांनी आपले जुने राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार उल्हास पाटील यांच्याशी हातमिळवणी करून निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये याची खबरदारी घेतली आहे.शिरोळ नगरपालिकेत मागील काही काळात भ्रष्टाचार,पाणीपुरवठ्याची ढिसाळ व्यवस्था आणि घनकचऱ्याच्या समस्यांवरून नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.लाचलुचपत प्रकरणात पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, आंदोलनेही झाली;मात्र त्यावेळी आमदार यड्रावकर यांनी दुर्लक्ष का केले,असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान,आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि,त्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने झाला का,याची चौकशी व्हावी,अशी मागणी होत आहे.शिरोळ ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच आमदार यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्तेची धुरा सांभाळली होती.परंतु गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.या पार्श्वभूमीवर आगामी प्रचार सभेत आमदार यड्रावकर यांनी या सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देतील अशी अपेक्षा मतदारवर्गातून व्यक्त केली जात आहे. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार असून,यड्रावकर यांच्या राजकीय रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.