प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत चालली असून, प्रभाग क्रमांक ९ मध्ये आता खरी राजकीय चुरस निर्माण झाली आहे.माजी नगरसेवक पद्मसिंह प्रकाशराव पाटील यांची यादव आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्याने शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.या निर्णयामुळे आमदार डॉ.राजेंद्र पाटील–यड्रावकर यांच्या गटात फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे.प्रभाग क्रमांक ९ हा पारंपारिक माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आणि पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.या प्रभागातील निकाल सत्तेच्या समीकरणांवर निर्णायक ठरतो,त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत सर्वच आघाड्यांचे लक्ष या प्रभागाकडे लागलेले असते.यादव आघाडीने पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी देताच, राजर्षी शाहू विकास आघाडीकडून माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांचे पुतणे अजिंक्य पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.त्यामुळे या प्रभागात अजिंक्य पाटील विरुद्ध पद्मसिंह पाटील अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.या दोन्ही नेत्यांचे पार्श्वभूमी बळकट असून, स्थानिक मतदारांमध्ये त्यांचा मजबूत प्रभाव आहे.एका बाजूला अमरसिंह पाटील यांचा अनुभव आणि विकासाची परंपरा आहे,तर दुसऱ्या बाजूला बाबा पाटील यांचा जनसंपर्क आणि संघटनशक्ती आहे.त्यामुळे प्रभाग नऊमध्ये अमरसिंह पाटील विरुद्ध बाबा पाटील असे अप्रत्यक्षपणे आमनेसामने चित्र तयार झाले आहे.शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक याआधीही अटीतटीची ठरली आहे,मात्र या वेळी प्रभाग क्रमांक ९ मधील लढतीमुळे निवडणुकीचे तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे.दोन्ही आघाड्यांचे प्रचारतंत्र, कार्यकर्त्यांची हालचाल आणि मतदारसंघातील समीकरणे यावरच अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे.सध्या तरी शिरोळमधील राजकीय वर्तुळात “प्रभाग नऊ” हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून,या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.