शिरोळ / प्रतिनिधी
“राजकारण करणं माझा धंदा नाही, निवडणूक लढवण्यात मला रस नाही,पण समाजकार्य आणि जनसेवेचे व्रत कधीच सोडणार नाही,” अशी भावनिक पोस्ट पत्रकार चंद्रकांत भाट यांनी सोशल मीडियावर टाकताच शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.या पोस्टमागे नेमका संदेश कोणासाठी होता,हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.चंद्रकांत भाट हे गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी न ठेवता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणे,समाजातील घटकांना न्याय मिळवून देणे,तसेच सर्व धर्मीयांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी केवळ निवडणुकीच्या काळात नव्हे तर वर्षभर सामाजिक कार्यात सातत्य ठेवले आहे. त्यामुळे शिरोळ शहरात त्यांचे नाव वेगळ्या विश्वासाने घेतले जाते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना भाट यांनी शैक्षणिक,आरोग्य,पर्यावरण आणि पत्रकारिता क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे.साधेपणाने आणि प्रामाणिकपणे समाजकार्य करण्याचा त्यांचा ध्यास असल्याने अनेक तरुण त्यांच्याकडे प्रेरणेच्या नजरेने पाहतात. दरम्यान,त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय तज्ज्ञ आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे की,भाट यांनी ही पोस्ट टाकून काही जणांना मार्मिक सल्ला दिला का? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.मात्र,भाट यांनी स्पष्ट केले आहे की त्यांना राजकारणात प्रवेश करण्याची कोणतीही इच्छा नाही.ते समाजकार्य आणि जनसेवाच आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात.शिरोळ शहरात त्यांच्या कार्याचा ठसा आणि लोकांशी असलेले घट्ट संबंध पाहता,त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यांच्या या पोस्टमुळे येत्या काळात शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.