जयसिंगपूर / प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरातील आगामी नगरपालिका निवडणूकही महायुतीसोबत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी साडे 4 वाजता जयसिंगपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.यड्रावकर म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक मूलभूत सुविधांवर काम केले असून, भुयारी गटार योजना, सुधारित पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गॅस पाईपलाईन यामुळे रस्त्यांची अवस्था खालावली असली तरी सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर कामांना सुरुवात होईल.शहरातील १५० झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर व प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्याची माहितीही त्यांनी दिली. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २६ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष अशा एकूण २७ उमेदवारांना महायुतीतून संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्य आणि केंद्रातील आपल्या विचारांच्या सरकारमुळेच शहराच्या विकासासाठी मोठा निधी मिळू शकतो, असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना अनिल (सावकार) मादनाईक यांनी सांगितले की,जयसिंगपूरच्या विकासासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष आणि राजर्षी शाहू विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे मिलिंद भिडे यांनी महायुतीच्या सरकारमुळे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.या पत्रकार परिषदेस संजय पाटील यड्रावकर,असलम फरास,राजेंद्र आडके,पराग पाटील,बजरंग खामकर,मिलिंद साखरपे,शैलेश आडके,रमेश यळगुडकर,संभाजी मोरे आदींसह महायुती, ताराराणी आघाडी आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.