चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात भाजपला दूर ठेवत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने हे राजकीय मनोमिलन साध्य झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले होते.शरद पवार गटाने भाजपसोबत कोणतीही युती शक्य नसल्याचे स्पष्ट केले असताना,अजित पवार गटाने महायुतीत सहभागी होत सत्तेत प्रवेश केला. मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनिमित्त आता दोन्ही गटांमध्ये सुसंवाद वाढू लागला आहे.चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्थानिक कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे.दोन्ही गटांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, या आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.या नव्या समीकरणामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले की,भाजप स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला दुर्लक्षित करत असल्याने आमच्यासाठी एकत्र येणं अत्यावश्यक होतं. लोकहितासाठी आणि विकासाच्या दृष्टीने आघाडी स्थापन करून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान,विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील आता एकत्र आल्याने चंदगडमधील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार आहे.त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नव्या आघाडीमुळे अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.