प्रतिनिधी / शिरोळ
गेल्या महिन्याभरापासून शिरोळ तालुक्यात सुरू असलेले ऊस आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या लढ्यामुळे दोन दिवस शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले आहे. आंदोलन अंकुश संघटनेच्या मागणीनुसार आज रविवार सकाळपासूनच पोलिसांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तपासणी मोहीम सुरू केली.या तपासणीदरम्यान केपीटी चौकात ऊस वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसलेल्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून,अनेक ट्रॅक्टर मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,आंदोलन अंकुश संघटनेचे सदस्य कृष्णा देशमुख आणि दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांच्यात केपीट चौकात सायंकाळी चांगलीच खडाजंगी झाली.ऊस दरवाढीच्या मागणीवरून दोघांमध्ये वाद तीव्र झाला असून,पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.ऊस दरवाढीचा तोडगा पुढील दोन दिवसांत निघेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.आंदोलन अंकुश संघटनेने आपले काही निवडक कार्यकर्त्यांसोबत हा लढा अधिक जोमाने सुरू ठेवला आहे.शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी संघटना ठाम असून,ऊस दराचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन न थांबविण्याचा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.सध्याच्या तपासणी मोहिमेमुळे ऊस वाहतूक थोड्या प्रमाणात विस्कळीत झाली असली,तरी शेतकरी आणि संघटनांचे नेते समाधानकारक तोडगा निघेल,अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.शिरोळ तालुक्यातील ऊस आंदोलनाचे पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.