प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील शनिवारी राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे.शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.नुकतीच शिरोळ नगरपालिकेत ताराराणी आघाडीने प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे.दरम्यान शिरोळ येथे झालेल्या भव्य मेळाव्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे आणि भाजपा युवा नेते राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी भाजप पक्ष,‘कमळ’ निवडणूक लढवणार असल्याची गर्जना केली होती.मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच वळण घेताना दिसत आहे.पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यास विरोध दर्शविल्याने,देशातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजप शिरोळ व कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे.या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान, भाजपचे सहयोगी जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ.अशोकराव माने यांनी शिरोळ नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाच्या चिन्हावर लढण्यास विरोध केल्याने भाजप पक्षाने ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे.तर कुरुंदवाड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी शिवसेना (शिंदे गट)चे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीचा रणसंग्राम लढवण्याची घोषणा केली आहे.या दोन्ही नेत्यांना भाजपचा निधी आणि पाठबळ असताना त्यांनी पक्षाचे अधिकृत चिन्ह न वापरण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्यासह निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.“पक्षाच्या ताकदीवर राजकारण करताना चिन्ह का नको?” असा सवाल जुन्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित होत आहे.दरम्यान, आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या तिन्ही नगरपालिकांमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे.त्यांच्या संघटनात्मक ताकदीमुळे तालुक्यातील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शिरोळ व कुरुंदवाड नगरपालिकेतील झालेल्या घडामोडीची राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांच्याकडून मिळाले असून येणाऱ्या काही दिवसांत गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे आणि भाजपा युवा नेते राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भूमिका काय असणार, याकडे केवळ शिरोळ तालुका नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.आगामी निवडणुकीत या आघाड्यांच्या राजकीय चाली तालुक्यातील सत्तेचे भविष्य ठरवणार,एवढे मात्र निश्चित.