प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे आता जोर धरू लागले असून राजकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे.मात्र, महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपावर एकमत न झाल्याने शिरोळमधील राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप,जनसुराज्य पक्ष आणि स्थानिक आघाड्यांमध्ये सुरू असलेली चर्चा अजून निष्पन्न झालेली नाही. त्यामुळे स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपकडून “ताराराणी आघाडी” हा नवा पर्याय समोर आणण्यात आला असला तरी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या पर्यायाला तीव्र विरोध दर्शविला आहे.गत पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळ नगरपरिषदेवर आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्ता मिळवली होती.या कार्यकाळात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक प्रभागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली.रस्ते, पाणीपुरवठा,ड्रेनेज,पथदिवे,उद्याने, सांस्कृतिक हॉल,समाज मंदिर,व्यायाम शाळा अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलला.या कामांसाठी आमदार यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने आघाडीची लोकप्रियता जनमानसात अधिक दृढ झाली.शहरात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाचा वेग वाढला असून,याच जोरावर ही आघाडी पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरून विविध राजकीय डावपेच रचले जात आहेत. दरम्यान,महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आराखडा तयार केला जात असला तरी, उमेदवार आणि प्रभाग वाटपावर अजूनही तोडगा निघालेला नाही.ही निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवावी आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ठाम असून त्यांच्या या भूमिकेला स्थानिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे.तर दुसरीकडे, जनसुराज्य पक्षाचे आमदार डॉ.अशोकराव माने आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र भाजप चिन्हावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये बैठकींची मालिका सुरू असून,अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याचदरम्यान, भाजपकडून “ताराराणी आघाडी” या नव्या समीकरणाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.या आघाडीच्या माध्यमातून भाजप स्वतंत्रपणे शिरोळमध्ये आपले अस्तित्व बळकट करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.मात्र,या निर्णयाला आमदार यड्रावकर यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने महायुतीतील तिढा अधिकच गडद झाला आहे.राजकीय पातळीवर या सगळ्या घडामोडींचा परिणाम थेट शिरोळच्या मतदारांवर दिसून येत आहे.गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीबद्दल सकारात्मक भावना आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार यड्रावकर गट आघाडीवर येईल,असा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो. दुसरीकडे मात्र “नवीन पर्याय” म्हणून ताराराणी आघाडी किंवा भाजप स्वबळावर लढवण्याची शक्यता जिवंत ठेवून राजकीय समीकरण गुंतागुंतीचे बनवत आहेत.जर महायुतीत एकमत झाले नाही तर यादव आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू विकास आघाडी,ताराराणी आघाडी किंवा भाजप असा थेट सामना शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेत होण्याची शक्यता शहरातील राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपरिषदा या जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.येथील सत्तेचा ताबा म्हणजे आगामी विधान परिषद,विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा बँक,कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील समीकरणावर प्रभाव टाकणारा आहे.त्यामुळे सर्व पक्ष व आघाड्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शिरोळ नगरपरिषदेवर पुन्हा राजर्षी शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकेल का,की भाजप पुरस्कृत ताराराणी आघाडी नवा डाव साधेल? सध्या तरी नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.महायुतीतील तिढा, आघाड्यांतील मतभेद आणि स्वबळाची भाषा या सर्व पार्श्वभूमीवर शिरोळची नगरपरिषद निवडणूक अत्यंत रंगतदार ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.