शिरोळ नगरपरिषदेत राजकीय समीकरणात उलथापालथ? – मा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर नव्या समीकरणांची हालचाल सुरू झाली आहे.जनस्वराज पक्षाचे आमदार डॉ.अशोकराव माने,शिवसेना (शिंदे गट) चे आमदार डॉ.राजेंद्र पाटील आणि राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे संजय पाटील यड्रावकर यांची अलीकडील जवळीक वाढल्याने,राजर्षी शाहू विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी नव्या राजकीय डावपेचाला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या शिरोळ येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिरोळ नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा घेतला.या बैठकीनंतर स्थानिक स्तरावर अमरसिंह पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.ते पुन्हा एकदा राजर्षी शाहू विकास आघाडीसोबत राहणार की नव्या युतीकडे झुकणार,याबाबत स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी दाखल करणार आणि कोणत्या पक्षांमध्ये युती होणार,याबाबत सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येही गटबाजीचे चित्र दिसू लागले आहे.काही गट अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे,तर काही जण थेट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर व आमदार अशोकराव माने संपर्कात असल्याचे समजते.शिरोळ नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीकडे सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.येत्या काही दिवसांत पक्षीय युती,उमेदवारांची घोषणा आणि स्थानिक नेत्यांच्या हालचालींमुळे राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत अमरसिंह पाटील कोणता राजकीय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!