कोल्हापूरमध्ये ऊस दर आंदोलन चिघळल ; संतप्त शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांड्या फेकल्या..
कोल्हापुर / प्रतिनिधी
ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना काही अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय.या घटनेमुळे पोलिसांची एकच धांदल उडाली. एकंदरीतच ऊसाचं आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. मागील काही दिवसांपासून कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात ऊस दरावरून तीव्र संघर्ष सुरू आहे.एकरकमी एफआरपीची मागणी आणि साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.घटनास्थळी कडक बंदोबस्त असूनही पोलिसांसमोर हा प्रकार घडला.अचानक कांड्या फेकल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.यावेळी पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन कांड्या बाजूला केल्या.आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्यांनी भरलेली पोती टाकून निषेध नोंदवला.जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असून,आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा,अशी मागणी होत आहे.