जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील आलास (अकिवाट) गुरुदत्त साखर कारखाना ते टाकळीवाडी दरम्यान कृष्णा नदीवर होणाऱ्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन सोहळा १८ ऑक्टोबर रोजी दुपारी मोठ्या थाटामाटात पार पडला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील,खासदार धैर्यशील माने तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मात्र, या सोहळ्याला शिरोळ तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निमंत्रण न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्याच्या जनतेचे प्रतिनिधी असूनही आमदारांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.या पार्श्वभूमीवर यड्रावकर गटात आजही राजकीय खदखद आहे.मला या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका मिळाली नाही,त्यामुळे मी उपस्थित राहिलो नाही.पुलाचे काम मंजूर करून आणले आहे, त्यामुळे कोणाला बोलवायचे, हे संबंधितांचे वैयक्तिक निर्णय असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सागर कन्स्ट्रक्शन यांनी देखील मला माहिती दिली नाही. तरीसुद्धा मी नाराज नाही. मी काम करणारा माणूस आहे, हे जनतेला माहित आहे.अशी आमदार डॉ. यड्रावकर यांनी संयमित प्रतिक्रिया दिली होती.आमदारांनी संयम राखला असला तरी त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाचे वातावरण अजूनही आहे.तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला न बोलावणे हा लोकशाहीचा अपमान आहे,अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.या घटनेमुळे जयसिंगपूर,शिरोळ व कुरुंदवाड शहरासह तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या हालचाल सुरू झाल्या आहेत.आगामी निवडणुकीत आमदार यड्रावकर यांचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी काही नेते प्रयत्नशील आहेत असा आरोप यड्रावकर गटाचे काही कार्यकर्त्यांचा असून नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमदार यड्रावकर कोणासोबत युती करतात,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.