ऊस दराची ३७५१ रुपयांची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन

Spread the love

बेडकिहाळ / प्रतिनिधी

कोल्हापूर,सांगली व कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३७५१ रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. रविवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री बेडकिहाळ येथे झालेल्या ऊस उत्पादकांच्या सभेत ते बोलत होते.गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक सीमाभागात ऊस दराच्या प्रश्नावर आंदोलनाला अधिक वेग आला आहे.बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३७५१ रुपये पहिली उचल व गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला २०० रुपये दुसरा हप्ता मिळाल्याशिवाय कारखाने सुरू न करण्याचा निर्धार केला आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी ठामपणे उभी आहे.शेट्टी यांनी सांगितले की,कोल्हापूर,सांगली व कर्नाटक सीमाभागातील साखर कारखानदार मोठ्या प्रमाणावर काटामारी व रिकव्हरी चोरी करत आहेत.कारखानदारांनी एकत्र येऊन कोल्हापुरात ३४०० रुपये आणि कर्नाटकात ३ हजार रुपये इतकाच दर देण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकी दाखवत ऊस वाहतूक थांबविली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखाने कर्नाटकातून तब्बल ८० ते ९० किलोमीटर अंतरावरून ऊस आणण्याचा प्रयत्न करत असून,जवाहर साखर कारखान्याने ९० किलोमीटरवरून येणाऱ्या ऊसाला ३४०० रुपयांचा दर देण्याची घोषणा केली आहे.या ऊसावर प्रतिटन सुमारे ११०० रुपये तोडणी-वाहतूक खर्च येणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ३७५१ रुपयांच्या दराची मागणी योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे,असे शेट्टी यांनी सांगितले.राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांना एकजूट राखण्याचे आणि मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

error: Content is protected !!