पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
ऊस दर निश्चित न करता ऊस तोडणी सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हालोंडी येथे शनिवारी जवाहर साखर कारखान्याचा ऊस भरलेला ट्रॅक्टर अडवून आंदोलन केले होते.यावेळी कारखान्याच्या स्थानिक संचालकांनी पुढील ऊस तोडणी थांबवण्याची ग्वाही शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व अकिवाट गावचे सरपंच विशाल चौगुले, सुधाकर पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, प्रकाश पाटील, विजय पाटील, अनिल पाटील आदी कार्यकर्त्यांना दिले होते. स्वाभिमानी संघटनेने कारखानदारांना ऊस दर जाहीर करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे.मात्र अद्याप कोणत्याही कारखानदारांनी संघटनेशी दराबाबत चर्चा केलेली नाही.या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हालोंडी येथे ऊस भरलेला जवाहर कारखान्याचा ट्रॅक्टर अडवण्यात आला.ट्रॅक्टर मालकाने त्वरित स्थानिक संचालक आदगोंडा पाटील यांना फोन करून माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचताच कार्यकर्त्यांनी ऊस दर ठरवण्याची वेळ आली आहे, पण दर न ठरवता तोडणी सुरू का? असा संतप्त सवाल केला. तसेच वाहनांचे नुकसान झाल्यास कारखाना जबाबदार राहील, असा इशाराही दिला.या वेळी संचालक पाटील यांनी आम्हीही तुमच्याच बाजूचे आहोत.हा ट्रॅक्टर जाऊ द्या, मात्र पुढील तोडणी थांबवू, अशी ग्वाही दिली.आंदोलनादरम्यान कारखाना समर्थकाकडून व्हिडिओ शूटिंग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. विशाल चौगुले म्हणाले, आम्ही कुणाला घाबरत नाही,आम्ही काही झाकून करत नाही.ट्रॅक्टर अडवल्यावर तुम्ही तत्पर, पण दर ठरवताना का नाही? या प्रसंगामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ऊस दरावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.