पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील पंचगंगा नदीकिनारी असलेल्या शिरोली विकास संस्थेच्या पाणीपुरवठा विभागातील मोटरचे स्ट्रक्चर बॉक्स फोडून चोरट्यांनी आतील तांब्याच्या पट्ट्या, मेन शूज आदी साहित्य चोरून नेले. या चोऱ्यात सुमारे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, गेल्या सात ते आठ महिन्यांत या पाणीपुरवठा केंद्राची ही तिसरी चोरी आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.आत्तापर्यंत जवळपास एक लाख रुपयांचे तांब्याचे व इतर इलेक्ट्रिक साहित्य या चोरट्यांनी लंपास केले असून, तरीदेखील पोलिसांना अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. दरम्यान, चोरट्यांनी पंचगंगा नदी परिसरातील गुंडा म्हमुलाल संनदे यांच्या शेतातील पाच एचपी क्षमतेची सबमर्सिबल मोटरही काढून नेली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधून एक लाख रुपयांचे तांब्याचे वायर चोरून नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे पांडुरंग पाणीपुरवठा संस्थेची केबल व इतर इलेक्ट्रिक साहित्यही या टोळीने पूर्वी चोरले असल्याची माहिती मिळाली आहे.या सलग होत असलेल्या चोऱ्यांमुळे पाणीपुरवठा संस्था व शेतकरी दोघेही चिंतेत आहेत. आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना आता या चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे नदीकाठच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या पावसाळ्यामुळे पाणीपुरवठा बंद असल्याने अजून किती मोटरपंप चोरीस गेले आहेत हे स्पष्ट झालेले नाही.सदर सर्व चोरींच्या तक्रारी शिरोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी या चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन मुद्देमाल जप्त करावा व त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.