धनाजी चुडमुंगे यांना मारहाण निषेधार्थ, शिरोळ शहर कडकडीत बंद

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला काल तीव्र वळण मिळाले आहे.रास्त आणि परवडणारा ऊस दर मिळावा,या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात साखर कारखान्याच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली.या घटनेनंतर शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शिरोळ शहर बंद ठेवण्यात आले.अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या आहेत.दत्त साखर कारखान्याने जाहीर केलेला ३४०० रुपये प्रति टन ऊस दर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याचा आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला होता.त्यांनी म्हटले होते की,कारखाना फक्त एफ.आर.पी.एवढाच दर देत असून,साखर व इतर उपपदार्थांना चांगले भाव मिळूनही शेतकऱ्यांना नफ्यातील हिस्सा दिला जात नाही.या पार्श्वभूमीवर चुडमुंगे यांनी शेतकऱ्यांना ऊस तोड न घेण्याचे आवाहन केले होते.दरम्यान,काही शेतकऱ्यांनी ऊस तोडीला सुरुवात केल्याचे लक्षात आल्यानंतर चुडमुंगे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कारखान्याच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. ट्रॅक्टरसमोर उभे असताना त्यांना ओढत नेण्यात आले असल्याचे साक्षीदारांनी सांगितले.या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ शहरात शनिवारी बंद पाळण्यात आला असून,युवा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.जर योग्य दराचा तोडगा तातडीने निघाला नाही,तर संपूर्ण शिरोळ तालुका बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.या घटनेनंतर ऊस दर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!