चिपरी / प्रतिनिधी
चिपरी येथील यड्रावकर यांच्या खाणसरीसमोर आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने गेट बंद आंदोलन करण्यात आले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील पैसे व चालू गळीत हंगामातील दर जाहीर न केल्याच्या निषेधार्थ आंदोलन आज सोमवार सकाळी करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे,जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,राकेश जगदाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.सायंकाळी या आंदोलनादरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून गेट बंद आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आणले.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पोलिसांना पुढे करून दडपशाही सुरू केली असल्याचा गंभीर आरोप धनाजी चुडमुंगे यांनी केला.चुडमुंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “यड्रावकर यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे मागील पैसे व चालू गळीत हंगामातील दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.आम्ही पैसे मिळाल्याशिवाय कारखान्यात ऊस पुरवठा होऊ देणार नाही.आमदारांनी पोलिसांचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला,पण आम्ही मागे हटणार नाही.“जोपर्यंत मागील ऊस बिलाची रक्कम व चालू गळीत हंगामाचा दर दिला जात नाही,तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ऊस कारखान्यात देऊ नये.” असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.या आंदोलनामुळे परिसरात प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.