शिरोळ / प्रतिनिधी
आगामी जयसिंगपूर,शिरोळ आणि कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुका भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट),शिवसेना (शिंदे गट) आणि राजर्षी शाहू विकास आघाडी या घटक पक्षांच्या महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते मुकुंद गावडे यांनी दिली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या युतीबाबत अधिकृत घोषणा आमचे नेते गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार डॉ.अशोकराव माने,माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्यासह महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.गावडे म्हणाले की,या निवडणुकांमध्ये महायुती एकत्रितपणे लोकांपुढे जाणार असून स्थानिकविकास,पाणीपुरवठा,स्वच्छता, आरोग्य आणि शहर नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर निवडणुकीची दिशा ठरविली जाणार आहे.जयसिंगपूर नगराध्यक्षपदासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रमुख जबाबदारी देण्यात येणार असून शिरोळ आणि कुरुंदवाड नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे राहणार आहे.या वाटपावर सर्व घटक पक्षांत एकमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.महायुतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विकासाचे मोठे निर्णय वेगाने घेता येतील,तसेच मतदारांमध्ये स्थिरता आणि विश्वास निर्माण होईल,असे मत नेत्यांनी व्यक्त केले.युतीतील सर्व पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणून मजबूत निवडणूक रणनिती तयार करण्याचे काम सुरू झाले असून,प्रत्येक नगरपरिषदेत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संघटनात्मक तयारीला वेग देण्यात येत आहे.गावडे यांनी पुढे सांगितले की,महायुतीचे ध्येय स्थानिक नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचे आहे.सर्व घटक पक्षांचा अनुभव आणि जनाधार लक्षात घेता ही युती आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवून शहरांच्या प्रगतीसाठी एकत्र काम करेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औपचारिक घोषणा झाल्यानंतर उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू होणार असून, जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसरातील राजकीय समीकरणांना नव्या दिशेचा वेध मिळणार आहे.