कागल उरुसातील आकाश पाळण्यात बिघाड; ८० फुटांवर २२ नागरिक अडकले, क्रेनच्या सहाय्याने सुटका

Spread the love

प्रतिनिधी / कागल

कागल येथे गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुसानिमित्त भरलेल्या जत्रेमधील आकाश पाळण्यात (जॉईंट व्हील) शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला.त्यामुळे सुमारे ८० फुटांच्या उंचीवर पाळणा थांबून २२ नागरिक हवेतच अडकले.या घटनेमुळे महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.आरडाओरड सुरू झाल्याने बापूसाहेब महाराज चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली.घटनास्थावरून माहितीनुसार, रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पाळण्याचा रॉड स्लीप झाल्याने तो हवेतच थांबला.त्या वेळी पाळण्यात महिला, मुले व वृद्ध नागरिक होते.घडलेली घटना लक्षात येताच उपस्थितांनी बचावकार्य सुरू केले.काहीजणांनी पाळण्यावर चढून अडकलेल्या नागरिकांना धीर दिला.मात्र, स्थानिक स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्याने प्रशासनाला पाचारण करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महापालिका व अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली.रात्री सव्वाअकराच्या सुमारास महापालिकेची भलीमोठी क्रेन मागवून सुटका कार्य सुरू करण्यात आले.सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील सर्व विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता.पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवून बघ्यांची गर्दी नियंत्रणात आणली.उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेत १२ नागरिकांना सुरक्षित खाली आणण्यात यश आले.उर्वरित नागरिकांचीही सुटका रात्री उशिरा करण्यात आली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र,प्रशासनाकडून पाळण्याच्या तांत्रिक तपासणीचे आदेश देण्यात आले असून आयोजकांकडून सुरक्षा उपाययोजनांबाबत चौकशी सुरू आहे.या घटनेमुळे जत्रेतील आनंदमय वातावरणाला काही काळ ताण चढला.

Leave a Comment

error: Content is protected !!