शिरोळ / प्रतिनिधी
आगामी शिरोळ,जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले तरी,या निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा गट) सहकार्याची भूमिका घेणार असल्याचे माजी आमदार उल्हास दादा पाटील यांनी स्पष्ट केले आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,”निवडणुकीत प्रतिनिधित्वाबाबत काही समज-गैरसमज असू शकतात.मात्र त्यावर मात करून लोकांना चांगले प्रशासन देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.त्यामुळे आवश्यक तडजोडी कराव्या लागल्या तरी सहकार्याची भूमिका आम्ही कायम ठेवू.पाटील पुढे म्हणाले की,नगरपरिषद निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय आणि सहकार्य अत्यावश्यक आहे. “कार्यकर्त्यांच्या भावना,त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा दाबून आम्ही पुढे जाणार नाही. निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांना संधी मिळाली पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.”निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असतात.मात्र जिंकताना कार्यकर्त्यांचा सन्मान, संघटनेची निष्ठा आणि जनतेचा विश्वास हे घटक तितकेच महत्त्वाचे आहेत,” असे मत व्यक्त करत त्यांनी स्पष्ट केले की, ‘कार्यकर्ता हाच पक्ष आणि कार्यकर्ता हेच धोरण’ या भूमिकेवरच आम्ही ठाम आहोत.आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षाच्या तत्त्वांचा आदर राखत स्थानिक स्तरावर एकजूट निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकहित आणि विकासाच्या अजेंड्यावर आधारित प्रशासन देण्याचे ध्येय घेऊन शिवसेना (उबाठा गट) निवडणुकीला सज्ज असल्याचे उल्हास दादा पाटील यांनी यावेळी सांगितले.”