शिरोळ / प्रतिनिधी
पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाबा उर्फ प्रतापराव शामराव पाटील आणि यादव गटाचे प्रमुख पृथ्वीराज यादव हे एकत्र आल्याने शिरोळ शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.प्रभाग क्रमांक ४ मधील नरेंद्र माने यांच्या नवीन गाडीच्या पूजन कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित राहिले होते.या कार्यक्रमानंतर दोघांचे एकत्रित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.स्थानिक राजकारणात दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे गट असून, त्यांच्या एकत्र येण्याकडे कार्यकर्त्यांसह मतदारांनीही लक्ष वेधले आहे. नगरपरिषदच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी “नवीन समीकरणांची सुरूवात तर नाही ना?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.मात्र कार्यक्रमातील उपस्थितांनी सांगितले की, या पूजन कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. नरेंद्र माने यांच्या वैयक्तिक निमंत्रणावर दोन्ही मान्यवर उपस्थित राहिले होते.तरीदेखील शहरातील राजकीय वातावरण मात्र रंगतदार झाले असून सोशल मीडियावर या फोटोला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.शिरोळ तालुक्यातील राजकारण नेहमीच चुरशीचे राहिले असून, स्थानिक स्तरावर नवीन आघाड्या व समीकरणे तयार होण्याची परंपरा आहे.त्यामुळे बाबा पाटील आणि पृथ्वीराज यादव यांच्या या एकत्र येण्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नवे संकेत मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पुढील काही दिवसांत या भेटीचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.